गणित शिकता शिकता
हे इतकं पक्कं झालं कि
हातात असेल ते
सगळंच खर्च करून नाही चालत
जमेला असू द्यावं काही
जे शिल्लक उरतं
ते जगण्याला बळ देत राहतं
हातात काहीतरी आहे
खर्च करण्यासाठी ..
या एकाच आशेवर
ढकलता येतो आजचा दिवस
उद्याच्या भरवशावर.....!
म्हणूनच
राहू द्याव्यात काही इच्छा
मनाच्या एखाद्या कोपऱ्यात
एखाद्या जुनेर केलेल्या इच्छेखाली लपवून ठेवावी
एखादी इच्छा
एखादी ढकलून द्यावी
मनाच्या फडताळावर
कुणाचं लक्ष जाणार नाही अशी ..
एखादी ठेवावी जपून
एखाद्या न वापरणाऱ्या डब्यात
खरंच राहू द्याव्यात काही इच्छा गाठीला शिल्लक
म्हणजे कुणीच नसेल आपलं
आणि छळायला लागेल एकटेपण
काहीच उरलं नाही हातात
आणि दाटून येईल भयाण भकासपण
तेंव्हा काढता येतील या इच्छा
ज्यांच्या भरवशावर
ढकलता येईल
उद्याचा दिवस !
जगण्यासाठी हा इतका हिशोब
तर यायलाच हवा...!
Comments
Post a Comment